अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तकास तोफखाना पोलिसांनी अटक केली.
सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते.
सध्या जिल्हा पोलिसांची गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची शोध मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आरोपी सोमनाथ राऊत याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
त्यामुळे आरोपी राऊत याला त्यांच्या ताब्यात दिले आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिग मी इंडिया कंपनीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत याच्यासह सात संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सतीश बाबूराव खोडवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सोमनाथ राऊत याच्यासह त्याची पत्नी सोनिया राऊत, वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुर्हाणनगर), प्रितम शिंदे (पुणे), प्रिती शिंदे (बालिकाश्रम रस्ता, नगर) आणि शॉलमन गायकवाड (रा. सावेडी)यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम