Ahmednagar City News : दाखल्यासाठी २ लाख रुपये मागतात, नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : अहमदनगर महानगर पालिकेची महासभा महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २०) पार पडली. या महासभेत मनपाच्या नगररचना विभागाच्या कारभारावरुन नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत,

नगर रचना विभागाचे पुरते वाभाडे काढले. विविध मुद्यावर महासभा चांगलीच गाजली. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांची ही महासभा शेवटची ठरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनपा आयुक्त पंकज जावळे महासभेला अनुपस्थित होते. परिणामी महासभेत गोंधळ उडला. श्री. जावळे हजर झाल्यानंतर सभा सुरळीत सुरु झाली. नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांनी नगररचना विभागाच्या कारभाराचा मुद्दा उपस्थित केला.

नगररचना विभागात घराच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी २ लाख रुपये मागतात, नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम दिला जातो, असा आरोप करण्यात आला.हा मुद्दा सर्वांनी उचलून धरल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली.

याबाबत चारठाणकर यांनी प्रशासनाच्या वतीने बाजू मांडली. ते म्हणाले, याबाबत चर्चा झाली. सूचना दिल्या आहेत. कामकाजाची पद्धत ठरवली आहे. तीन दिवसात प्रत्येक फाईल तपासून वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे येईल. चुकीच्या पध्दतीने कुणी सांगत असेल, मागणी करत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

नगरसेवकांकडे गेल्यावर काम होणार नाही, असे कर्मचारी सांगतात. हे काय फुकट काम करतात का? किती पगार आहेत यांना? असा सवाल संपत बारस्कर यांनी केला. अधिकारी काम करतात, खालचे कर्मचारी हेतू ठेवूनच काम करतात, बिल्डरच्या घरी बसतात, नगरसेवकांना चुकीची उत्तरे देतात, असा गंभीर आरोप कुमार वाकळे यांनी केला.

१०० चौरस फुटाची किती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याची माहिती सभा संपायच्या आत सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी चारठाणकर यांना दिले. यावेळी मनपाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे यांच्या हस्ते करावे, अशी मागणी शिला चव्हाण यांनी केली. त्यास संपत बारस्कर, कुमार वाकळे यांनी अनुमोदन दिले.

महासभेत पथदिव्यांचा प्रश्न सागर बोरुडे यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदार थर्ड पार्टी ऑडिट सुरू असल्याचे सांगून मटेरियल नसल्याचे सांगतात. त्यामुळे कामे ठप्प आहेत. त्यावर नवीन पथदिवे का बसवले जात नाहीत,

असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी केला. त्यावर उत्तर देताना विद्युत विभागाचे बल्लाळ यांनी थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण झालेले असल्याचे सांगितले. सभागृहात नुसती गोड गोड बोलून उत्तरे देतात,

नंतर काही काम करत नाही, असा आरोप सागर बोरुडे यांनी केला. अमरधाम, कब्रस्तानमध्ये तरी लाईट लावा, अशी मागणी कुमार वाकळे यांनी केली. पथदिव्यांचे टेंडर बोगस झाले आहे, काही ठेकेदार काम करत नाही,

एक महिन्यात प्रश्न मार्गी लागेल, असे सांगण्यात आले होते, याची आठवण बोराटे यांनी करुन दिली. उजेडच पडत नाही, स्पॉट लाईट की स्ट्रीट लाईट हेच कळत नाही, असा सवाल योगीराज गाडे यांनी केला.

सर्व ७३ सदस्यांचा एकत्रित फोटो काढून पालिकेत लावा, नवीन प्रथा सुरू करा.. प्रत्येक पंचवार्षिकचा एक फोटो सभागृहात पाहिजेच, अशी सुचना स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी केली. कुमार वाकळे म्हणाले,

बोल्हेगाव परिसरात मोठी रो हाऊस स्कीम केली, त्याला रस्ता नाही, मोठा घोटाळा केला आहे, माझ्या वार्डातील रस्ते बदलले, कमी केले, ले आऊट रीवाईज केले, मोठा स्फोट होणार आहे. १०० टक्के ओपन स्पेसवर अतिक्रमण झालीत.

आम्ही कारवाई करायला सांगितले की, आमची नावे त्यांना सांगतात. ३१ तारखेनंतर नागरीक ज्या दिवशी आमच्याकडे येतील, त्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठोकून काढणार, काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या, ९० टक्के ओपन स्पेसवर अतिक्रमण आहेत. रस्तेही गायब आहेत. अतिक्रमणातील जागेवर मटका, दारूचे धंदे सुरू आहेत, अशा गंभीर आरोप त्यांनी केला.