अहमदनगर शहर

शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या प्रतिमेस महिलांकडून चपलांचा आहेर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

सर्जेपूरा कराचीवालानगर येथे झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. पिडीत महिलेचे नांव निवेदनात नमुद करुन ते सोशल मिडीयावर व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने यावेळी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गोविंद अण्णा मोकाटे यांनी एका मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेला न्याय मिळण्याअगोदरच राजकीय दबाव आणून आरोपीला पाठिशी घालण्याचे काम केले जात असून, आरोपी फरार असताना या आरोपीची जिल्हा परिषद निवडणुसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी उमेदवारी जाहीर केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या प्रकरणात आरोपीच्या पत्नीने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पिडीत महिलेचे नांव सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामुळे सदर महिलेची समाजात मोठी बदनामी झाले आहे.

आरोपींच्या समर्थकांनी पिडीत महिलेचे नांव जाणीवपुर्वाक बदनामी होण्याच्या उद्देशाने व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन पिडीत महिलेचे नांव व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे.

तसेच आरोपीला अटक न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालया समोर पिडीत महिलेसह उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office