माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात, बाळासाहेब साळुंखे, अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्षे आदी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा बँकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती, याकडे लक्ष वेधले असता आगामी पद भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.खासगी व राष्ट्रीयीकृत बँका गावपातळीवर जाऊन सेवा देऊ लागल्या आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. मोबाइल बँकिंग सेवा सुरू झाली आहे. इतर सुविधा लवकरच सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा
राहुरीतील बंद पडलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद ठेवून चालणार नाही, त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर तो भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाणार असल्याचेही कर्डिले यांनी स्पष्ट केले.
कर्डिले पुढे म्हणाले की, जिल्हा बँकेतील ६० टक्के पदे रिक्त आहेत. विविध रिक्त असलेल्या ७०० पदांच्या भरतीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांना पाठविण्यात आलेला आहे. इतर ५०० पदांसाठीचा प्रस्तावही लवकरच पाठविण्यात येणार असून, ही भरती प्रक्रिया राज्य सरकारमार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कर्डिले म्हणाले.
अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बँकेचे संचालक माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच काहींची प्रत्यक्ष भेटही घेतली असून, यापुढे बँकेत राजकारण न आणता जुन्या जाणत्या नेत्यांनी जी परंपरा निर्माण केली, ती कायम ठेवणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमध्ये होतो. त्यावेळीही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना बँकेमध्ये राजकारण नको, असे सांगून अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली. परंतु, नवीन अध्यक्ष निवडताना थोरात व पवार यांनी बाजूला ठेवले. बँकेत राजकारण आणले. हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. त्यांनी निवडणूक ताकदीने लढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार निवडणूक लढविली आणि जिंकलो, असे कर्डिले म्हणाले.
अध्यक्षपदाची निवडणूक झाली, आता राजकारण बाजूला ठेवून सर्व संचालकांच्या संमतीने कारभार केला जाईल, ज्येष्ठ नेते स्व. मारोतराव घुले, स्व. आबासाहेब निंबाळकर, स्व. भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख यांनी बँकेत शिस्त, परंपरा निर्माण केली. तीच परंपरा आपण काय ठेवू, असे सांगताना नूतन अध्यक्ष कर्डिले यांनी आपण जाणीवपूर्वक आज स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे औचित्य साधत सूत्रे स्वीकारल्याचे सांगितले. शेतकरी व साखर कारखानदार अशा दोघांनाही न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा