अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात सहकार चळवळ टिकून ठेवण्यासाठी आबासाहेब निंबाळकर तसेच भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर स्व. नागवडे यांनी स्वतःचे आयुष्य झिजवले आणि सर्वसामान्य जनतेची सेवा केली.
स्व. नागवडे बापूंनी बेलवंडी येथील डाहाणुकरांचा खासगी कारखाना घेऊन त्याचे सहकारी कारखान्यात रूपांतर केले. कारखाना उभा करण्यासाठी कष्ट केले. कारखाना उभा करून सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रपंच उभा केले. तालुक्यात कारखान्याच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री आणत तालुक्याचा विकास केला, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
श्रीगोंदे कारखान्यावर सहकार महर्षी स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अामदार बबनराव पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पवार म्हणाले, सहकार महर्षी स्व. शिवाजीराव नागवडे यांनी बारामतीच्या शाळेत शिक्षण घेऊन श्रीगोंद्यात सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी सहकारी कारखान्याची उभारणी करत त्या माध्यमातून शिक्षणाचे दालन उभे करून तालुक्याचा विकास केला. या पुढेही बापूंचा आदर्श समोर ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन श्रीगोंद्यातील नेत्यांना केले.
जिल्ह्याला शरद पवारांकडून मिळणार गिफ्ट ! जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणााले, नगर जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादीला सर्वाधिक आमदार मिळवून दिले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न पवार साहेबांच्या आशीर्वादाने मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पूर्वी काळे, कोल्हे, शेळके, घुले या एका पिढीने संपूर्ण जिल्हा सांभाळला आहे. यात नागवडे बापू यांचे मोठे योगदान अाहे. त्यांच्या कामाची राज्यात मोहोर आहे. त्याचप्रमाणे पवार ज्यावेळी केंद्रात कृषिमंत्री होते.
त्याचवेळी मी राज्याचा कृषी मंत्री होतो आणि हाच काळ माझ्यासाठी अतिशय सुखदायक ठरत पवार साहेबांच्या बरोबर काम करताना भरपूर काही शिकावयास मिळाले. असे सांगत पुढे म्हणाले की श्रीगोंदे तालुका तितका सोपा नाही, राज्यात जितके पुढारी, नेते, कार्यकर्ते नसतील तितके श्रीगोंदे तालुक्यात आहेत मात्र येथे विरोधाच्या वेळी विरोध आणि सुख दुःखाच्या वेळी विरोध विसरून एकत्र येतात ही ख्याती आहे.