अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील पहिलवानांना अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने कुस्ती लिग स्पर्धेच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही कुस्ती लिग स्पर्धा डिसेंबर मध्ये होणार असून, या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या पहिलवान व महिला कुस्तीपटूंना दि. 10 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा तालिम संघाच्या सर्जेपुरा येथील छबू पैलवान तालीम येथील कार्यालयात नांव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे,
सचिव अॅड. धनंजय जाधव, खजिनदार पै. नाना डोंगरे, पै. विलास चव्हाण, पै.नामदेव लंगोटे यांनी केले आहे. कुस्ती लिग स्पर्धा डिसेंबर मध्ये सलग सहा दिवस चालणार असून, त्याचे नियोजन सुरु आहे.
दोन वर्षापूर्वी राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक प्राप्त व सहभागी खेळाडूंना या स्पर्धेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या खेळाडूंना टीम मालक आपल्या संघात घेईल त्यांना लिगमध्ये खेळता येणार आहे.
या स्पर्धेत खेळू इच्छिणार्या पैलवानांसाठी (मुले) 58, 65, 74, 84, 84 ते 120 किलो तसेच महिला कुस्तीपटूंसाठी 51 किलो वजनगटाप्रमाणे नांव नोंदणी करायची आहे.
नांव नोंदणीसाठी येताना खेळाडूंना पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पै. नामदेव लंगोटे 9823243235 व पै. नाना डोंगरे 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.