Ahmednagar News : आता जग बदलत चाललं आहे. सगळी दुनिया हायटेक झाली आहे. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन खरेदी असे सगळे ऑनलाईन झाल्यानं जमानाचं ऑनलाईन झाला आहे. आता मंदिरेही हायटेक झाली आहेत.
अहमदनगरमधील काही मंदिरात आता डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक ऑनलाइन पद्धतीने दान करत आहेत. संगमनेर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील १२ मंदिरांमध्ये डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या व राज्यात प्रथम राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.
मंदिरांमध्ये पारंपरिक दानपेट्यांसोबत आता डिजिटल दानपेट्या पाहायला मिळत आहेत. तेथे भाविक अॅण्ड्रॉइड मोबाइलच्या माध्यमातून दान करताना दिसतात.
अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत, परंतु डिजिटल दानपेटी असल्याने भाविकांनी केलेले दान पूर्णपणे सुरक्षित राहते. ते दान थेट मंदिराच्या बँक खात्यांमध्ये जमा होते, असे बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश कलंत्री यांनी सांगितले.
डिजिटल दानपेटी हा उपक्रम बँकेचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ उद्योजक राजेश मालपाणी यांच्या संकल्पनेतून समोर आला आणि तो यशस्वी ठरला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकेच्या ग्राहकांसाठी यूपीआय सेवेच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर डिजिटल दानपेटी बनविताना सुरक्षिततेची काळजी घेतली गेली आहे.
भाविकांनी केलेले दान संबंधित मंदिराच्या बँक खात्यामध्ये जमा होते. त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न शक्य नाही. पैसे दान करण्यासाठी स्कॅन केल्यानंतर मंदिर अथवा ट्रस्टचे नाव येते, त्यामुळे ते खाते कुणाचे आहे,
हे भाविकांच्या लगेचच लक्षात येते. दानपेटी उघडल्यानंतर पैसे मोजण्यासाठी बराच वेळ जातो. पुन्हा ते पैसे घेऊन बँकेत भरण्यासाठी यावे लागते परंतु डिजिटल दानपेटी असल्याने चिल्लर अथवा नोटांची मोजदाद करावी लागत नाही.
उपक्रमाचे होतेय कौतुक !
या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. या उपक्रमांमधून भाविकांनाही इच्छित असणारे दान करता येते. सुट्टे पैसे ठेवणे, चिल्लर मोजण्याचे टेन्शन, चोरी होण्याचे भय, तसेच पैशांची हेराफेरी आदी गोष्टी यामुळे आता होणार नाहीत. त्यामुळे या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले आहे.