Ahmednagar News : भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे. याला खेळापेक्षा अधिक महत्त्व आहे. आपल्या देशात प्रत्येक गावात एक क्रिकेट टीम असतेच. क्रिकेटची एवढी भन्नाट क्रेज कदाचित जगातील दुसऱ्या कोणत्याच देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 11 सदस्यीय क्रिकेट संघाने विजयी पताका फडकवली पाहिजे असे प्रत्येकालाच वाटते.
विश्वचषकासारखा टूर्नामेंट असला तर ट्रॉफी जिंकावी म्हणून अनेक लोक देवाला साकडे घालतात. होम-हवन, पूजा-पाट करतात. यामुळे आपल्या देशातील अनेक तरुणांना भारतीय क्रिकेट संघात जाऊन देशासाठी खेळण्याची इच्छा असते. क्रिकेट संघात जाऊन चांगली कामगिरी करावी आणि देशाचे नाव रोशन करावे असे अनेकांना वाटते.
दरम्यान अहमदनगरमधील किरण चोरमले यांनी देखील असेच स्वप्न पाहिले होते. विशेष म्हणजे किरण यांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. यामुळे अहमदनगरच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला लागला आहे. अहमदनगर येथील हुंडकेरी अकॅडमीच्या किरण चोरमले याची अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट टीम मध्ये निवड झाली आहे.
जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या अंडर नाईन्टीन जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या 22 जणांमध्ये त्याचा समावेश आहे. किरण हा एक ऑलराऊंडर आहे. तो एक उत्तम उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे.
त्याने आपल्या कौशल्यातून सिलेक्टर्स कमिटीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्याला अंडर नाईन्टीन इंडियन क्रिकेट टीम मध्ये जागा मिळाली आहे.
विनू मंकड स्पर्धेत केली उत्तम कामगिरी
बीसीसीआयने विनू मंकड एक दिवसीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना किरण यांनी उत्तम कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने नऊ सामन्यात दोन शतके ठोकली होती. एक अर्धशतक देखील त्याने मारले. यामुळे या स्पर्धेत त्याची एकूण धावसंख्या 428 एवढी झाली होती. विशेष म्हणजे त्याने फलंदाजी करत आठ बळी घेतले होते.
या स्पर्धेत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याला अंडर नाईन्टीन जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट टीम मध्ये जागा मिळाली आहे. सध्या अंडर नाईन्टीन एशिया कप सुरू असून यामध्ये देखील त्याची निवड झाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेत प्रत्यक्षात भाग घेता आला नाही मात्र तो राखीव खेळाडू म्हणून टीम मध्ये सामील आहे.