अहमदनगरचा जवान सुट्टीवर आला ! ईव्हीएम हॅकसाठी अडीच कोटींची मागणी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : ईव्हीएम हॅक करून देण्याचे आमिष दाखवून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडीच कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

मारुती नाथा ढाकणे (रा. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो लष्करात जवान म्हणून कार्यरत असून त्याची पोस्टिंग जम्मू-काश्मीर येथे आहे. तो सध्या सुट्टीवर आलेला आहे. त्याच्यावर खूप मोठे कर्ज झालेले आहे, ते फेडण्यासाठी त्याने ही शक्कल लढवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाच चुना लावण्याचा प्रयत्न केला.

मी तुम्हाला ईव्हीएम हॅक करून देतो, त्यासाठी अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने दानवे यांच्याशी संपर्क साधून केली. दानवे यांनाही त्याच्याबद्दल संशय होता, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनी अॅडव्हान्स म्हणून १ लाख रुपये आपल्या सोबत घेतले. त्यांच्या साथीला आर्थिक गुन्हे शाखेची टीम देण्यात आली.

बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. दुपारी चार वाजेच्या सुमारास राजेंद्र दानवे आणि साध्या ड्रेसवरील पोलीस कर्मचारी, अधिकारी आरोपीस भेटले. मारुती ढाकणे यास यावेळी एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्याचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण झालेले असून त्याला ईव्हीएम किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांबाबतचे कोणतेही ज्ञान नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

ढाकणेची चौकशी

ढाकणे याने अशाचप्रकारे राज्यात इतर ठिकाणी इतरांना गंडा घातला आहे का, या गुन्ह्यात त्याचे इतर कुणी साथीदार आहेत का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरेही तपासातून पुढे येतील, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, सय्यद मोसीन, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार, पोलीस कर्मचारी विजयानंद गवळी, सचिन शिंदे, भागीनाथ बोडखे, विठ्ठल मानकापे, गणेश शिंदे, परमेश्वर भोकरे, संदीप जाधव, नितीश घोडके यांनी ही कारवाई केली.

ईव्हीएम हॅकिंगबाबत लोकांमध्ये संभ्रम – दानवे

या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ढाकणे मला फोन करत होता. इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनमध्ये चीप बसवून त्या हॅक करतो, त्यात पाहिजे तसे मतदान करून घेतो,

असे त्याने सांगितले होते. मात्र, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, हे मला माहिती होते. मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली. आरोपीशी माझी ओळख नाही तसेच शत्रुत्वही नाही. ईव्हीएम मशीनबाबत जनतेमध्ये असलेला संभ्रम अशा प्रकारांनी वाढतो. तो संभ्रम कमी करण्याची जबाबदारी या देशाचा एक नागरिक म्हणून मला वाटली, ती मी पार पाडली.