अहमदनगर, मराठवाडा पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर ! जायकवाडीत केवळ ‘इतकेच’ टक्के पाणी शिल्लक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मराठवाड्याची जलसंजीवनी असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. जायकवाडी धरणात केवळ १८ टक्के जलसाठा उपलब्ध असून तीव्र उन्हामुळे दररोज धरणातील १ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती मिळाली आहे.

कमी जलसाठा, वाढते बाष्पीभवन यामुळे जलसंपदा विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

यंदा अल्प पावसामुळे व वरील भागातून आवश्यक पाण्याची आवक न झाल्याने जायकवाडी धरणात मोजकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, वाळूज औद्योगिक वसाहत, परभणी, पैठण, अंबड, गेवराई, शेवगाव, पाथर्डी आदी शहरांना पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा व शेतीसिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील अनेक गावे अवलंबून आहे. मात्र यंदा धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. सध्या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव असले तरी परळी औष्णिक वीज निर्मिती उर्जा प्रकल्पासाठी व शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. ही पाणीपाळी बंद झाल्यावर उर्वरित पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला जाणार आहे.

सध्या तीव्र उन्हामुळे दररोज १ दलघमी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असून हे बाष्पीभवन धरणातून पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतीना दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तीन पट आहे. सध्या धरणात केवळ १८.०३ पाणीसाठा उपलब्ध असून

पाणीसाठा ४५७.७८५ मिटर म्हणजे १५०१.९१ फुट आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठा अल्प असल्याने धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागा समोर असून यासाठी मोठी कसरत जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे.

 उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या उन्हाच्या तापमानाचा परिणाम येथील जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. कडक उन्हाने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यावरही पाणी संकट

अहमदनगर जिल्ह्यात देखील पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. त्याचप्रमाने आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला त्यामुळे शेतीवरही पाणीसंकट उभे ठाकले.

तर दक्षिणेतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुळा धरणात देखील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe