Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदार संघामधून निवडून आलेले खासदार निलेश लंके हे कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
धक्कादायक म्हणजे त्यांनी यावेळी त्यांच्याकडून सत्कारही स्वीकारला. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून खा. लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली व त्यावेळी त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले गेले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना फटकारले होते. आता लंके यांच्या भेटीनंतर विविध चर्चाना उधाण आले असून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
कुख्यात गुंड आहे गजा मारणे
गजानन मारणे हा मुळ मुळशी तालुक्यातील रहिवासी असून तो मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गजा मारणे यास अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी कोर्टाने मारणे यास शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता.
हम आह भी करते हैं तो… अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र
हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता… अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ज्यावेळी पार्थ पवार गजा मारणे भेट झाली त्यावेळी मोठा गदारोळ केला होता.
आज नीलेश लंके सन्मानाने सत्कार स्वीकारत असल्याने बारामती अथवा अहमदनगरमधील काही अप्रिय घडामोडींमागे गजा मारणेचा देखील हात होता का हे पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.