अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगरमधील ओढ्यांवर ११८ अतिक्रमणे ? कारवाई नाही, सफाई कधी? पावसाळ्यात पाणी वाहणार कसे?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर शहरात सद्यस्थितीला ४१ ओढे आहेत. पावसाळ्याच्या आधी या नाल्यांची साफसफाई पालिका करत असते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास मदत होते.

परंतु जर यात कसर राहिली तर पावसाचे पाणी शहरात तुंबून राहते व यामुळे रहिवासी व प्रवासी दोघांचेही हाल होतात. मागील पावसाळ्यात उड्डाण पुलाखाली झालेली अवस्था सर्वश्रुत आहे. दरम्यान शहरातील वड्यांवर अतिक्रमणचा विळखा बसलेला आहे.

एका रिपोर्टनुसार शहरात ११८ ठिकाणी अतिक्रमण करून ओढे बुजविण्यात आले असल्याची चर्चा आहे. नोटिसा बजावून देखील हे अतिक्रमण कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ओढ्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती आहे.

शहरातून जाणाऱ्या ओढ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अनेक ठिकाणी ओढ्यांवर पक्की बांधकामे उभी आहेत, तर काही ठिकाणी पाईप टाकून ओढे बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील ओढे-नाले नाहीसे झाले आहेत.

परिणामी पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नागरिक कृती मंचच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली.

त्याची दखल घेत लोकायुक्तांनी ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. परंतु यावर कितपत कार्यवाही झाली हा देखील संशोधनाचा विषय आहे असे लोक म्हणतात.

पावसाळा तोंडावर आला आहे. आता तरी महापालिकेने ओढ्यांवरील अतिक्रमण काढावे अन्यथा पावसाळ्यात घरात पाणी शिरून नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, एका त्रयस्थ संस्थेमार्फत ओढ्या- नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

शहरात १९७२ पासून २१ ओढे नाल्यांची नोंद आहे. परंतु त्यावर अतिक्रमण झाल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातून नवीन २० ओढे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील ओढ्यांची संख्या आता ४१ झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

लवकरच नालेसफाई


शहरातील ओढे-नाल्यांची साफसफाई करण्यासाठी महापालिकेने दोन वेळा निविदा मागविली. परंतु हे काम करण्यासाठी ठेकेदार पुढे आले नाहीत. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एक ठेकेदार पुढे आला आहे. आठ दिवसांत नालेसफाईचे काम सुरू होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
Ahmednagarlive24 Office