Ahmednagar News : बिबट्यांचे चार वर्षात १२०० हल्ले, वन विभागाकडे फक्त २० पिंजरे..

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

Ahmednagar News  : वन्यप्राण्यांचा अधिवास मानवाने नष्ट केला व त्याचा परिणाम असा झाला की वन्यप्राणी मानवी वस्तीत अतिक्रण करू लागले. अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांत बिबट्याची दहशत व धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अगदी केडगाव, नगर शहर अशा भर वस्तीत देखील बिबट्याने दर्शन दिले आहे.

ग्रामीण भागात तर बिबट्याचे हल्ले, पशुधनाचे मृत्यू हे अगदी नित्याचेच झालेय. नुकतीच राहुरीमध्ये वेदिका श्रीकांत ढगे या चिमुरडीचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेला व जिह्यात पुन्हा शोककळा पसरली. एका मीडियाच्या रिपोर्टनुसार चार वर्षात बिबट्याने तालुक्यात तब्बल १२०० पेक्षा अधिक हल्ले केले आहेत.

मात्र दुर्दैवाने प्रत्येकवेळी अपुरे मनुष्यबळ, पिंजऱ्यांची कमतरता आदी कारणामुळे त्यांचा बंदोबस्त होत नाही. राहुरी तालुका पूर्वीपासूनच वनराईने नटलेला आहे. वनक्षेत्राची राखरांगोळी होत असल्याने बिबट्यांनी मानवी वस्त्यांकडे आगेकूच केलेली आहे. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने राजरोसपणे वृक्षतोडी होत आहे.

वन हद्दीत वृक्षतोडीने जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांना हक्काचा निवारा शेती क्षेत्रात लाभत आहे. दरम्यान, खरीप लागवड सुरू असताना ऊस क्षेत्र झपाट्याने कमी झालेले आहे. त्यामुळे बिबट्या आता शेती क्षेत्रात किंवा रस्त्यावर फेरफटका मारताना आढळू लागला आहे. भक्षाच्या शोधामध्ये भरदिवसाही बिबट्याचे दर्शन होत असताना अनेकांकडून वन विभागाशी संपर्क साधला जातो.

बिबट्या दिसल्याने पिंजरा लावण्याची मागणी केल्यास नेण्याच्या खर्च, देखभाल व बिबट्याला अडकविण्यासाठी प्राण्याच्या व्यवस्थेपासून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांकडून प्रश्नांचा भडीमार केला जातो. वन विभागाकडून पिंजऱ्याची संख्या केवळ २० असल्याचे सांगत त्यापैकी अनेक पिंजरे नादुरूस्त असल्याचे कारण दिले जाते. वन विभागाचे अधिकारी मृत वेदिकाला २५ लाखाची मदत देत असल्याचे सांगत अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत का असा सवाल नागरिक करत आहेत.

राहुरीतील बिबट्यांचे हल्ले
साल                     हल्ले
२०१९-२०               ३३३
२०२०-२१               ३०८
२०२२-२३               ३००
२०२३-२४               ३०८