Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये विशेषतः उत्तरेत ऊस उत्पादन जास्त घेतले जाते. परिणामी येथे साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. दक्षिणेतही कारखाने आहेत. परंतु यंदाचा गळीत हंगाम २०२३-२४ हा संपलेला असूनही अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पेमेंट केलेले नाही.
जिल्ह्यातील कारखान्यांकडे ऊसबिलाचे १४९ कोटी थकले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसह प्रहार सारख्या संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. त्यांच्या आंदोलनानंतर प्रादेशिक साखर कार्यालयाने कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेतली.
३१ मे २०२४ पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकित असणारे जवळपास १४९ कोटी रुपये जमा करण्याबाबत आदेश दिले आहेत. अहमदनगरच्या प्रादेशिक उपसंचालक (साखर) असणाऱ्या शुभांगी गोंड यांनी सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकाना लेखी आदेश दिलेत.
आदेशात त्यांनी म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२३-२४ हा संपलेला आहे. १५ मे २०२४ रोजीच्या एफआरपी पंधरवाडा अहवालानुसार बहुतांश कारखान्यांनी ऊस पुरवठादारांना संपूर्ण ऊस बिल अदा केलेले नाही. ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार ऊस पुरवठादाराचा ऊस कारखान्यास प्राप्त झाल्याच्या १४ दिवसांपर्यंत ऊस पेमेंट करणे आवश्यक असते.
परंतु असे असले तरी आपण विलंबाचे व्याजसह ऊस बोल अदा न केल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. दरम्यान या संदर्भात २२ मे रोजी आढावा सभा घेण्यात आली. या सभेत कारखान्याच्या प्रतिनिधींनी थकीत ऊस बिलाबाबत लेखी दिले. त्यानुसार बिल अदा करावे, असे आदेश दिले.
जर या नुसार झाले नाही व यात दिरंगाई झाली तर साखर आयुक्तालयास पुढील योग्य कार्यवाही प्रस्तावित केली जाईल. याची गांभीर्याने नोंद घेण्याचा गोंडे यांनी दिलाय. दरम्यान शेतकऱ्यांचे थकित ऊस बिलाचे पैसे देण्यात यावेत अशी मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात ठिय्या व मुक्काम आंदोलन देखील करण्यात आले होते.
प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील संचालक, उपसंचालक आणि साखर आयुक्त कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.