Ahmednagar News : आता पावसाळा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन देखील झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मृगाच्या सरी देखील कोसळल्या. दरम्यान जिल्ह्यातील आठ नद्या आहेत त्या काठावरील तब्बल २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करत आहे. पावसाळ्यामध्ये नद्यांना महापूर येणे, जुन्या इमारती, मोठे वृक्ष पडणे, यासह अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे.
रबर, फायबर आणि इन्फ्लेटेबल रबर बोट अशा आठ बोटी, पाचशे प्रशिक्षित आपदा मित्र (स्वयंसेवक) साधनांसह सज्ज आहेत. संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता महसूल, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे.
‘या’ आठ प्रमुख नदीकाठावरील २२३ गावांना पुराचा धोका
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आठ प्रमुख नद्या अशा आहेत की त्यांच्या काठावर वसलेले २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना, खैरी, म्हाळुंगी या आठ नद्यांना महापुराचा धोका असतो.
आता या अनुशंघाने प्रशासनाने आतापासूनच पूर स्थितीशी लढण्यासाठी तयारी केली आहे. यासोबतच अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात आली आहे. योजना त्यासाठी ५०० स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड केली आहे.
आपदा मित्र योजनेच्या माध्यमातून आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी आपदा मित्रांना ८ ते १० दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आली आहे.
का येतो महापूर ?
जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांवर मोठी धरणे असल्याने पावसाळ्याच्या प्रारंभीच्या दोन-तीन महिने महापुराची शक्यता कमी असते. अतिवृष्टी, धरणातील विसर्ग (नांदूर मधमेश्वर, नाशिक), खडकवासला, चासकमान, घोड (पुणे), मुळा, भंडारदरा, निळवंडे (अहमदनगर), उजनी (सोलापूर) आणि जायकवाडी (छत्रपती संभाजीनगर) या धरणांचा फुगवटा यामुळे महापुराचा धोका निर्माण होतो.