Ahmednagar News : अपघाताचे प्रमाण वाढले असून आता नगर शहर परिसरात काल गुरुवारी (दि. ३०) एकाच दिवसात तीन अपघात झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आले आहे. मनमाड रोड, कल्याण रोड व केडगाव येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले आहेत.
पहिला अपघात नगर कल्याण रोडवर रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढे बायपास चौकाजवळ गुरुवारी (दि.३०) पहाटे १ च्या सुमारास झाला. या अपघातात अंकुश गहिनीनाथ गर्जे (वय २७, रा. सुरुडी, ता. आष्टी, जि. बीड) याचा मृत्यू झाला आहे.
त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. दुसरा अपघात नगर मनमाड रोडवर विळद घाटात रात्री ९ च्या सुमारास झाला. यामध्ये अनिल दशरथ बर्डे (वय ३१, रा. चिंचोली, ता. नगर) हा मयत झाला आहे. अपघातात तो जखमी झाल्यावर परिसरातील
नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी रात्री ९.४५ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. तिसरा अपघात पुणे महामार्गावर केडगाव येथील सोनेवाडी चौकात झाला. एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
रावसाहेब मळूजी काळे (वय ७० रा. अस्तगाव, ता. पारनेर) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी (दि.३०) दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. मयत काळे हे दवाखान्यात उपचारासाठी केडगाव येथे आलेले होते. तेथून गावी जाण्यासाठी सोनेवाडी चौकात ते रस्ता ओलांडत असताना
नगर ते घोसपुरी जाणाऱ्या एस.टी.बस खाली सापडून ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी नगरमधील पॅसीफिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी ७.२० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.