अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगरमध्ये ४८ मिनिटे पाऊस, तापमानात ५ अंशाने घट ! यंदा अहमदनगरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, पेरणीपूर्व मशागतीस वेग

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. नगर शहरात शुक्रवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाने ४८ मिनिटे हजेरी लावली.

या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी.

शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत नगर शहरासह जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान बदलाचा परिणाम ऋतुचक्रावर देखील झाला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल व मे महिना ढगाळ वातावरण व तुरळक पावसाचा ठरला.

१०६ टक्के पावसाचा अंदाज
१४ मे पर्यंत नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस राहील. नगर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. पहिल्या टण्यातील अंदाजानुसार १०६ टक्के जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

सहा दिवसांत तापमानात ५ अंशाने घट
अवकाळी पावसामुळे शुक्रवारी तापमानात गेल्या सहा दिवसाच्या तुलनेत ५ अंशाने घट झाली. सहा दिवसांपूर्वी ४१ अंशावरील तापमान शुक्रवारी पाच अंशाने कमी होऊन ३७ अंशावर स्थिरावले होते. तापमानात घट झाली असली तरी गारव्याबरोबरच उकाडा देखील हवामानात जाणवत होता.

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
२५ मे पासून रोहिणी नक्षत्र लागणार असल्याने या कालावधीपासून मानसून पूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग आला आहे. पाऊस चांगला होईल असा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

Ahmednagarlive24 Office