Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाळा सुरु होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण चार महिन्यांत सरासरी ४४८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. गेल्या दोन महिन्यांत सरासरी ३३१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
एकूण अपेक्षित पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात ७४.२ टक्के पाऊस झाला आहे. श्रीगोंदा तालुक्याने दोन महिन्यांतच सरासरी ओलांडली आहे. या तालुक्यात १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरी १०८.२ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना पडला मात्र १७७.३ मि.मी. झाला आहे.
जुलै महिन्यात सरासरी ९७.५ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना १५४.४ मि.मी. झाला आहे. या दोन महिन्यांत सरासरी २०५.७ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, सरासरी ३३२.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या दोन महिन्यांत सरासरी १२६ मि.मी. पाऊस अधिक झाला आहे. गेल्या वर्षी फक्त सरासरी १६७ मि.मी. पावसाची नोंद होती.
‘या’ गावांना इशारा
दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. मागील आठवड्यात पाण्याचा विसर्ग बारा हजार क्युसेकपर्यंत होता. तो कमी करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात ६ हजार ७८७ क्युसेकने विसर्ग सुरू होता.
तो दुपारी बारा वाजता कमी करून तीन हजार ९६२ एवढा करण्यात आला. म्हणजेच सध्या चार हजार क्युसेक पाणी नदीपात्रात आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग होत असून, सुरू असलेल्या पावसामुळे विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
नगर ७१.७, पारनेर ८४.७, श्रीगोंदा १०७.१, कर्जत ९९.८, जामखेड ८४.३, शेवगाव ६८.७, पाथर्डी ९७.५, नेवासा ५८.७, राहुरी ५३.८, संगमनेर ७१.२, अकोले ७६.२, कोपरगाव ५८.३, श्रीरामपूर ४९.८, राहाता ५३.३