Ahmednagar News : जिल्ह्यातील लहान मोठ्या नऊ धरणांमध्ये रविवारी ४३ हजार ५९१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठा ८५.३१ टक्के आहे.
भंडारदरा भरल्यात जमा असून, मुळा आणि निळवंडे ही धरणेही येत्या काही दिवसांत भरण्याची आशा आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अडीच महिन्यांत ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठ्याने तळ
गाठला होता.
त्यामुळे धरणांतील लाभक्षेत्रातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी दमदार पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे सर्वच नऊ लहान मोठ्या धरणांत पाणी आवक झाली. जिल्ह्यातील नऊ लहान मोठ्या प्रकल्पांची साठवण क्षमता ५१ हजार ९३ दलघफू इतकी आहे. सध्या भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुथडी वाहत आहे.
आढळा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. रविवारी (दि.११) सकाळी ७ वाजता मुळा धरण ८७ टक्के, निळवंडे धरण देखील ९१.६९ टक्के भरले आहे. त्यामुळे नऊ धरणांत ४३ हजार ५९१ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ३९ हजार १५६ दलघफू इतका होता. या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सीना, मांडओहळ या धरणांत अद्याप ३० टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रातील जनतेत धाकधूक आहे.
धरणनिहाय पाणीसाठा दशलक्ष घनफूट (कंसात टक्के)
भंडारदरा : १०५७२ (९५.७७)
मुळा : २२८०० (८७.०१)
निळवंडे : ७६२२ (९१.६९)
आढळा : १०६० (१००)
मांडओहळ : ३० (७.५१)
सीना : ६६९ (२७.८८)
खैरी : ३७३ (६९.९८)
विसापूर : ६४२ (७०.९४)