Ahmednagar News : विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष व अधीक्षकांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मयत मुलाची आई भक्ती गणेश बावरे (रा. गणेश चौक, बोल्हेगाव, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा साईराज गणेश बावरे हा आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टच्या एमआयडीसी येथील बालवसतिगृहात होता. त्याचा सोमवारी (दि. २०) सकाळी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.
वसतिगृहातील बाहेरील बाजूस जीर्ण झालेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव अधीक्षकांना होती. असे असताना देखभाल व दुरुस्ती केली गेली नाही. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहात विजेचा धक्का बसून साईराज गणेश भामरे (मूळ रा. हातगाव, ता. नगर) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान नातेवाइकांनी बालगृहाच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मयत मुलगा मूळ शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील असून नागापूर एमआयडीसी येथील निंबळकरोडवरील आठरे पाटील बालगृहात वास्तव्यास आलेला होता. त्याचे वडील मयत असल्याने त्याला नातेवाइकांनी बालगृहात ठेवले होते.
वसतिगृहात असताना साईराज याला विजेचा धक्का बसल्याने तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. दरम्यान या घटनेची माहिती समजल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती.