अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी केलेल्या असभ्य वर्तन प्रकरणातील तक्रारदार व भामरे यांची चौकशी समितीकडून गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली.
पाथर्डीच्या माळीबाभुळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर कॅमेऱ्यासमोर तक्रारदार व आरोप असणारे तहसीलदार विनोद भामरे यांचे जबाब समितीने नोंदवून घेतले.
शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी कार्यालयातील महिला कर्मचारी, तलाठी यांना कामाच्या नावाने बोलावून घेऊन त्यांच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदारांवर कारवाई करावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या पालकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली असून, चौकशी सुरू झाली आहे. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच महिला सदस्यांची समिती गुरुवारी पाथर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयात आली.
तिथे शेवगाव तहसील कार्यालयातील सर्व लिपीक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी व तलाठी यांच्या साक्ष कॅमेऱ्यासमोर नोंदविण्यात आल्या. ज्यांच्यावर आरोप आहे ते विनोद बामरे यांचीही साक्ष नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. समिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करील. त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल.