Ahmednagar News : शेतावरून अनेकदा वाद विवाद होत असतात. मात्र काही कारण नसताना देखील शेतात राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा कोणीतरी खून केल्याची घटना घडली आहे. लहानू गोपाळा पालवे (वय ६०, (रा. सुकेवाडी), या शेतकऱ्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मारहाण करून खून केला आहे. ते शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगाचे राखण करत होते, गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत ही घटना शिराळ शिवारात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुकयातील सुकेवाडी येथील शेतकरी लहानू गोपाळा पालवे यांची शिराळ शिवारात जमीन आहे. सध्या त्यांच्या शेतामध्ये भुईमुगाचे पीक होते. मात्र रात्रीच्या वेळी रानडुकरे भुईमुगाच्या शेंगा खातात म्हणून पालवे हे शेतामध्येच राखण करीत होते. गुरुवारी रात्री त्यांनी शेजारच्या धर्मा पालवे यांच्याकडे मोबाईल चार्जिंगला लावला.
त्यानंतर ते शेतात राखण करण्यासाठी गेले. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लहानू पालवे आले नाहीत म्हणून त्यांचा मोबाईल घेऊन धर्मा पालवे हे शेतामध्ये गेले असता, झोपडीसमोर लहानू पालवे हे बेशुद्ध अवस्थेत दिसले. धर्मा पालवे यांनी लहानु पालवे यांच्या पत्नीला याबाबत मोबाईलवरून माहिती दिली.
लहानू पालवे यांची पत्नी चंचाळा पालवे या घटनास्थळी आल्या, तेव्हा त्याचे पती मयत झालेले होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालवे यांचा मृतदेह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात नेला, तिथून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगर येथे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवला.
शुक्रवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. सुकेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मयताची पत्नी चंचाळा लहानू पालवे यांनी पाथर्डी पोलिसांत माझ्या पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मारहाण करून जखमी करून जीवे मारले, अशी नोंदवली आहे.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. लहानू पालवे याची कोणाशी दुश्मनी नव्हती, तरी तरी त्यांचा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी शोधून काढून त्यांना कडक शासन व्हावे, अशी मागणी मयताच्या पत्नी चंचाळा पालवे यांनी पोलिसांकडे केली आहे.