Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत.
आता थेट बंदुकीच्या फैरी झाडून चोरट्यांना पळवून लावावे लागले असल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथे.
भावडी येथे सुभाष भोस यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे.
गावापासून काही अंतरावर वास्तव्यास असल्याने भोस यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मागील महिन्यात चार चोरट्यानी भोस यांची तारेचे संरक्षक कुंपण तोडून आत प्रवेश केला.
घराच्या पाठीमागच्या बाजूचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरु असताना सुभाष भोस जागे झाले. चोरट्यांची चाहूल लागल्याने त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदुकीतून आकाशात फायर केले. चोरट्यानी तिथून पलायन केले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
या घटनेला महिना उलटत नाही, तोच काल (दि. १८) मध्यरात्री पाच ते सहा चोरट्यानी तारेचे कुंपण तोडून आत प्रवेश केला. दरवाजा तोडण्याचा आवाज ऐकू येताच सुभाष भोस जागे झाले.
त्यांनी पुन्हा बंदुकीतून फायर केल्याने चोरटे पळून गेले. एकाच ठिकाणी दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने भोस कुटुंबीय भयभित झाले आहे. सुभाष भोस म्हणाले,
महिनाभराच्या कालावधीत दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाल्याने हा नेमका काय प्रकार आहे, ते समजायला तयार नाही. पोलिसांनी सखोल तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
नगर तालुक्यातही चोरट्यांचा वावर दिसून येत आहे. पोलिसांनी सखोल तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.