Ahmednagar News : अहमदनगर शहरात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. टोळक्यांची दहशत, मारहाणीच्या घटना ताजा असतानाच आता नगर सावेडी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून टोळक्याने डॉक्टरसह कुटुंबियांनाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या टोळक्याने इलेक्ट्रिक साहित्य, बेड व इतर बस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटर मधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्टरच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय ७३, रा. आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्यावर, झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोपड़ी कॅन्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड),
घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले. त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करत हॉस्पिटलमधील बेड, इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केले. त्यानंतार ऑपरेशन थिएटरमधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या
डॉ. आठरे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच ५० लोक घेवून येवू आणि तुम्हाला उध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या टोळक्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
टोळक्यांची वाढती दहशत
टोळक्यांची सध्या प्रचंड दहशत वाढली आहे. नगर शहरासहउपनगरात देखील टोळीयुद्धाच्या घटना घडत आहेत. या घटना नगरच्या सुरक्षेत बाधा निर्माण करणाऱ्या असून पोलिसांनी लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.