Ahmednagar News : लोकांना परिवर्तन हवे होते. जनशक्ती एकवटली. सर्वपक्षीय समविचारी मतदारांनी मदत केली. पदापेक्षा व सत्तेपेक्षा सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा असून कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी अशा उपेक्षित वर्गाकडे लक्ष केंद्रित करून कामे करू. पदाची हवा डोक्यात जाऊ न देता जनतेचा सेवक याच भावनेने काम करायचे आहे. कामातूनच त्यांचा उतराई होऊ, असे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे सुभाष मरकड यांच्यावतीने खासदार लंके यांची पेढेतुला करण्यात येऊन नाथ संप्रदायाचे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबीच्या वृक्षाची पूजा केली. त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार लंके यांचा दौरा पाहून त्यांना भेटण्यासाठी कल्याण, मुंबई, सिन्नर येथील त्यांचे चाहते मढीमध्ये येऊन थांबले होते.
अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अण्णासाहेब मरकड होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, बाळासाहेब ताठे, बंडू पाटील बोरुडे, रफिक शेख आदी उपस्थित होते.माजी सरपंच बाबासाहेब मरकड यांनीही लंके यांच्या विजयाबद्दल कानिफनाथ गडाच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडून मनोकामना पूर्ण केली.
ढाकणे यांनी भाषणातून पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. ग्रामस्थांकडूनसुद्धा पाणी प्रश्नाची आग्रही मागणी लंके यांच्याकडे करण्यात आली.या वेळी बोलताना लंकेम्हणाले, मी मोठा भाग्यवान असून, माझ्या मतदारसंघात प्रमुख देवस्थाने आहेत.
शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यावर आपण तालुकानिहाय आढावा बैठक घेऊन कामांची सद्यस्थिती बघू. काय कामे करायची आहेत, याची यादी मतदार देतील. त्याची पूर्तता कशी करायची, याचा आराखडा आपण करू.
देवाला मानणारा कार्यकर्ता असल्याने मतदारसंघातील प्रमुख देवस्थान विश्वस्तांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांचा एकत्रित अहवाल तयार करू. आचारसंहिता अजूनही जारी असल्याने कामे मार्गी लावण्यावर मर्यादा आहेत. तोपर्यंत मतदारसंघाचा दौरा करत मतदारांचे दर्शन घेऊ.
मुंबईतही आपल्यावर प्रेम करणारी माणसे आवर्जून भेटतात. अशा लोकांचं आपला परिचयसुद्धा नाही, पण नाव ऐकून व कार्य बघून लोकांना भेटण्याची इच्छा होते, असे भाग्य कोणाच्याही वाट्याला येत नाही. मढी, मोहटा, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी, ही देवस्थाने आपली ऊर्जा केंद्रे असल्याने तीच ऊर्जा कार्यरूपाने पुढे चालेल, असे लंके म्हणाले.