अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ट्रॅक्टर-कंटेनरचा भीषण अपघात ! दोन अपघातात दोन ठार, चार जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅक्टर-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार झाल्याची तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २०) घडली.

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात हॉटेल शिवशाहीसमोर रात्री एकच्या सुमारास कंटेनर व ट्रॅक्टरचा अपघात झाला. कंटेनरने क्रमांक (एमएच ४६, एएफ २२६१) छत्रपती संभाजीनगरकडून अहमदनगरकडे जात असताना समोर चाललेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.

या अपघातात मच्छिंद्र तारामण पवार (रा. सुपा, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. जालिंदर नारायण पवार (रा. सुपा, ता. पारनेर) यांच्यासह दोन लहान मुले, एक महिला जखमी झाली आहे. हा अपघात झाला त्यावेळी जोराचा पाऊस सुरू असल्याने जखमी रस्त्यालगत पडलेले होते.

स्थानिक ग्रामस्थ स्वप्निल तवले, सचिन म्हस्के, राजू तवले, मनोज तवले, मायकल पाटोळे यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरा अपघात सायंकाळी चारच्या सुमारास इमामपूर गावच्या कमानीजवळ झाला.

दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात मनीषा संभाजी मिसाळ (रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी एमआयडीसी पोलिसांनी भेट देऊन वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान जेऊर परिसरातील विविध चौक अपघातासाठी धोकादायक ठरत आहेत.

जेऊर येथील गवारे वस्ती चौक, बसस्थानक परिसर, मुख्य चौक, महावितरण कंपनी, इमामपूर चौक, लिंगाडे वस्ती चौक हे अपघातासाठी धोकादायक पॉईट ठरत आहेत.याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

Ahmednagarlive24 Office