Ahmednagar News : हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या देवळाली प्रवरातील २९ वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणाने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १३ जून रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा मृत्यू कसा झाला याविषयी नागरिक उलटसुलट चर्चा करत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरातील विवाहित तरुण नितीन सुरेश वाळुंज हा गुरुवारी रात्री राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील एका हॉटेलवर जेवणासाठी आला होता. हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला खुर्चीवर बसलेला असताना अचानक खाली पडून जमिनीवर कोसळला.
हॉटेल मालक व कामगारांनी धाव घेतली असता मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. नेमकी नितीन वाळुंज यांचा मृत्यू कशामुळे झाला हे कोणालाच समजू शकले नाही.
घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाबासाहेब शेळके, राहुल यादव यांनी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूज, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, भाजप शहराध्यक्ष वसंत कदम यांनी मदतकार्य केले.
तदनंतर रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आज शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन देवळाली प्रवरात दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालानंतर नितीन वाळुंज यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली होती. दरम्यान, हा मृत्यू कसा झाला याविषयी नागरिक उलटसुलट चर्चा करत आहेत.