अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अबब ! शेतात १२ फुटी अजगर, मोठमोठ्याने फुत्कार, शेत मजुरांची भीतीने गाळण, नंतर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वाघ, बिबट्या, रानडुकरे आदी वन्य प्राण्यांची दहशत शेतकऱ्यांमध्ये आहे. उत्तरेत याचे प्रमाण जास्त आहे. आता यासोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचेही भय आता येथील शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रवरा नदीपट्यातील गावांमध्ये विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले असल्याचे वास्तव आहे.

दरम्यान आता संगमनेर तालुक्यातील खळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल १२ फुटी अजगर निघाल्याने नागरिकांची भितीने गाळण उडाली. शेतमजूर शेतात काम करत असताना भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात एक भलामोठा अजगर निपचित पडलेला दिसला.

त्यामुळे या अजगराला पाहून लोक चांगलेच घाबरले. तत्काळ तेथील एका सर्पमित्रास बोलावण्यात आले. त्याने या अजगराला पकडले. खळी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास मजूर हे काम करीत असताना सागर भाऊसाहेब नागरे या तरुणाला संशयास्पद हालचाल होताना दिसली.

त्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहिले असता भला मोठा म्हणजे तब्बल १२ फूटाचा अजगर निपचित पडलेला आढळला. त्याला हा साप मेला असेल असा भास झाला. तो त्याच्या अगदी जवळ गेला असता अजगराने भितीपोटी मोठ्याने फुत्कार टाकला. त्यानंतर मात्र सर्वांचीच चांगलीचं धांदल उडाली.

आवाज ऐकून शेतात काम करत असलेले लोकं तेथे धावले. त्या सर्वानी प्रसंगावधान दाखवत आश्वी येथील सर्पमित्र याला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच त्या सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेतली. तेथे येऊन त्याने अजगराला ताब्यात घेतले.

दरम्यान तो पर्यंत तेथे असणाऱ्या उपस्थित लोकांची भितीने गाळण उडाली होती. अजगराला ताब्यात घेताच शेतमजुरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यावेळी काही ग्रामस्थांसह शेतात काम करणाऱ्या महिला, मजूर याठिकाणी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office