अहमदनगर बातम्या

अबब ! ‘येथे’ २४ तासातच ३४५ मिमी, नद्यांना पूर, धरणं झपाट्याने भरतायेत.. पहा अहमदनगरमधील आजची स्थिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरू आहे. मागील वर्षी (२०२३) १ जून ते २५ जुलै या कालावधीत १२८ मिमी पावसाची नौंद झाली होती, यंदा मात्र, पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असून, आतापर्यंत अपेक्षीत सरासरीच्या १६८ टक्के पाऊस झाला.

अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिश्चंद्रगडासह भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत तब्बल १४ इंच (३४५ मिमी) पाऊस घाटघर परिसरात झाला, तर पांजरे व रतनवाडीतही १३ इंच पाऊस झाला.

अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गुरुवारी पहाटे मुळा नदीचा कोतूळ येथील प्रवाह पंचवीस हजार क्युसेक इतका होता.

जिल्ह्यातील सर्वांत जास्त गतिमान जलप्रवाह असणाऱ्या मुळा पाणलोट भागातील हरिश्चंद्रगड, अंबित बलठण, कोथळे, कहोणे या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. नाशिक, घोटी, इगतपुरी व गोदावरीच्या पाणलोटात पावसाने धुमशान केले आहे.

या भागात बुधवारी ९३४ मिलीमीटर (३७ इंच) पाउस झाल्याने दारणा चरणातून गोदावरी नदीत ११९४६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. चालू पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पहिलाच विसर्ग असून, यंदा प्रथमच कोपरगावमधून वाहणारी गोदावरी वाहती झाली आहे.

१ जून ते २५ जुलै या कालावधीत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिमी)
नगर ३३२.७, पारनेर ३३२, श्रीगोंदे ४१३, कर्जत ४३१, जामखेड ४६८, शेवगाव २९२, पाथर्डी ४४५, नेवासे २३४, राहुरी २२३, संगमनेर २४०, अकोले ३२६, कोपरगाव २२४, श्रीरामपूर २२०, राहाता २२८ मिमी

धरणातील पाणीसाठा
भंडारदरा          ७४.४७%
निळवंडे            ४९.३३ %
मुळा                ४५.८३%
आढळा            ५८.७७%

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office