शिर्डी येथील सागर शेजवळ हत्याकांड खूपच गाजले होते. या खून प्रकरणात आरोपी योगेश ऊर्फ गोट्या सर्जेराव पारदे (रा. कोल्हार खु, ता. राहुरी) हा कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात कोठडीत होता. शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याला रक्ताची उलटी झाली.
पारदे याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अंधाराचा फायदा घेत त्याने पोलिसांना चकवा देत तो फरार झाला. ही घटना रविवारी (ता.२) मध्यरात्री सव्वा दोन वाजता घडली. फिर्यादीत म्हटले की, शिर्डी पोलिस ठाण्यात खूनप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील
आरोपी योगेश ऊर्फ गोट्या सर्जेराव पारदे (रा. राम मंदिराजवळ, कोल्हार खु., ता. राहुरी) हा कोपरगाव दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दुय्यम कारागृहातून सदर आरोपीला उपचार कामासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे फिर्यादी घेऊन जात होते. शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या पुढील चौकात दुचाकी वाहनाचा वेग कमी झाला.
त्यावेळी आरोपीने दुचाकीवरून उडी मारून धूम ठोकली. फिर्यादी ढाकणे यांनी आरोपीचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात आरोपी योगेश पारदे यशस्वी झाला. शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. ते आरोपीचा शोध घेत आहेत.
नुकतेच शहरातून सिव्हिल हॉस्पिटलमधून पिटांतर्गत कारवाई झालेली महिला पसार झाल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार होणे ही तर अतिशय चिंतेची बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत.