Ahmednagar News : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत शेतकरी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. अहमदनरमधील अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत. अनेकांनी खडकाळ माळरानावर सोने पिकवले तर कुणी पावसाच्या पाण्यावर डाळिंब उत्पन्न घेतले.
असे अनेक उदाहरणे आहेत. आता एकरी २१ क्विंटल तूर तर प्रतिहेक्टरी ३२.६३ क्विंटल उडीद चे उत्पादन घेण्याची किमया अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी केली आहे. मिरजगावच्या राजश्री मिनीनाथ गोरे असे उडीद उत्पादक शेतकरी महिलेचे नाव आहे तर पिंपळवाडीचे संजय सोपान पोटरे हे तूर उत्पादक शेतकरी आहेत.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२३ मध्ये विविध १९ पिकांसाठी राज्यांतर्गत खरीप हंगामातील पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये उडीद आणि तूर या दोन्ही पिकांत कर्जत तालुक्यातील या दोन्ही शेतकऱ्यांनी प्रथम स्थान घेतले.
उडीद पीक सर्वसाधारण गट स्पर्धेत मिरजगावच्या राजश्री मिनीनाथ गोरे यांनी प्रतिहेक्टरी ३२.६३ क्विंटल उत्पादन घेत अव्वलस्थान मिळविले. यासह कर्जत तालुक्यातील पिंपळवाडीचे संजय सोपान पोटरे
यांनी तर पीक सर्वसाधारण गटात प्रतिहेक्टरी ५४ क्विंटल उत्पादन घेत प्रथम स्थान मिळविले. आता या दोन्ही शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस शासनामार्फत दिले जाणार आहे.
एकरी २१ क्विंटल तूर उत्पादन कसे घेतले?
कोणतेही उत्पादन घेणे सहज शक्य नसते. त्यांना योग्य नियोजनाची गरज असते. बियाणे प्रक्रिया, जैविक खत व जैविक बुरशीचा वापर, ठिबक सिंचनचा वापर, ३५-६०-९० दिवसांनी शेंडा खोडणी आदी उपाययोजना करण्यात आल्या.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये सूक्ष्म मूलद्रव्याचा ठिबकमधून वापर करण्यात आला. दाण्याचे वजन वाढविण्यासाठी बोरॉन व पोटॅश खतांचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पक्षी थांबे, सापळा पीक, निंबोळी अर्क आदींचा वापर केला असल्याचे शेतकरी संजय पोटरे सांगतात.
एकरी १३ क्विटंल उडीद उत्पादन कसे घेतले?
रेनपाइपचा वापर, बियाणे प्रक्रिया- जैविक खत व जैविक बुरशीचा वापर, तणनाशकाचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून पेरणी अगोदर कुजलेले ४ टन शेणखताचा वापर, बोरॉन व पौटॅश खतांचा दाण्याचे वजन वाढवण्यासाठी वापर केला असे शेतकरी राजश्री गोरे सांगतात.