Ahmednagar News : सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय यंदापासून शालेय शिक्षण विभागाने घेतला खरा पण त्याचे अद्याप कुठे पालन होताना दिसत नाही.
राज्यपाल रमेश बैस यांनी शाळा सकाळी लवकर असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही असा मुद्दा मांडला होता त्यानुसार शाळेची वेळ बदलण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
आतापर्यंत शाळेच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. जिल्हा परिषद, अनुदानित शाळा सकाळी दहा ते ५ या वेळेत भरत होत्या. तर काही खासगी मराठी, इंग्रजी शाळा सकाळी सातलाच भरत होत्या. सकाळी सात वाजता शाळा असेल तर विद्यार्थ्याला सहा किंवा त्यापूर्वीच उठावे लागते.
परिणामी मुलांची झोप होत नाही. त्याचे आरोग्यावर परिणाम होतात, अशा काही तक्रारी राज्यपालांकडे आल्या होत्या. त्यानुसार राज्यपालांनी शिक्षण विभागाला सूचना देत या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरण्याच्या सूचना दिल्या. पण अद्याप यावर अनेक शाळांनी कार्यवाही केल्याचे दिसत नाही.
शासन निर्णयाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा अधिकार शिक्षण विभागाला देण्यात आला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील एकाही शाळेवर अद्याप अशी कारवाई करण्यात आलेली नाही.
शाळा सकाळी भरवल्यास…
काही कारणास्तव शाळांना सकाळी ९ पूर्वी वर्ग भरायचे असतील तर त्याबाबत स्पष्ट व लेखी कारण देणे शाळांना बंधनकारक आहे. कारण रास्त असल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांकडे आहेत अशी माहिती समजली आहे.