Ahmednagar News : पुण्यातील ‘पोर्शे’ अपघातानंतर अहमदनगर पोलिसांची धडक मोहीम, विविध ठिकाणी नाकाबंदी, मद्यपींचा बंदोबस्त..

Ahmednagarlive24 office
Published:
police

Ahmednagar News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत अंदाधुंद कार चालविल्याने दोन निरपराधांचा बळी गेला. या घटनेने अहमदनगर पोलिस दल सतर्क झाले असून, मद्यपींच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी १४ मद्यपींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने विना क्रमांकांच्या पार्थे कारने मोटारसायकलवरील दोघांना धडक दिली. त्यात दोन निरपराधांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, वाहतूक शाखा, आरटीओ या विभागांतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

या पार्श्वभूमीवर नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सलग तीन दिवस सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहने तपासावीत, ही नाकाबंदी रात्री ९ ते पहाटे १ वाजेपर्यंत राहील. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारपासून नाकाबंदी सुरू करण्यात आली असून, शनिवारपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित विभागाचे उप अधीक्षक स्वतः नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. नाकाबंदी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्याही सूचनाही करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात येत आहे. या दरम्यान संशयित वाहन चालकांच्या ब्रेथ अनालायझरव्दारे तपासणी करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करून अहवाल पोलिसांना दिला जाईल, असे सांगण्यात आले.

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने
शहर व परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना दिसतात. यापूर्वी पोलिसांनी शाळा व महाविद्यालये परिसरात धडक मोहीम राबविली होती. त्यामुळे हे प्रमाण कमी झाले
होते. परंतु, पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने पुन्हा अल्पवयीन मुले वाहने चालवत असून, पालकही मुलांच्या हाती वाहने देत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

हॉटेल चालकांना अभय ?
शहरासह हॉटेल्स व आस्थापनांना रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र शहरासह नगर-मनमाड, पुणे, कल्याण, सोलापूर महामार्गावरील हॉटेल, परमिट बार रात्री ११ नंतरही सुरू असतात. या हॉटेल्समध्ये दारू पिऊन मद्यपी बिनधास्तपणे वाहने चालवितात अशी चर्चा आहे.

धक्कादायक म्हणजे आईसक्रीमची दुकानेही उशिरापर्यंत सुरू असतात. कारमधून नागरिक आईसक्रीम खाण्यासाठी येतात. ते वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रात्री अकरा नंतर हॉटेल व आस्थापनांना सुरु ठेवण्यास बंदी आहे. मात्र शहरातील आईसक्रीम व खाद्याचे दुकाने रात्री उशीरा पर्यंत सुरु असतात असे नागरिक सांगत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe