Ahmednagar News : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेने फारच कमी झाला आहे. मात्र पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आल्याने येत्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची काळजी नाही. किमान या महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. मात्र पाऊस लांबला तरी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी शुक्रवारी केले.
सालीमठ निवडणूक संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आज तातडीने जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेतला. त्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पाण्यावर उपलब्धता पाहता जुलैपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येत आहे.
मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा खूप कमी झाला आहे. भंडारदरा, मुळा व निळवंडे या मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्याची सर्व भिस्त आहे. मात्र गोदावरी कालव्यांवर असलेल्या पाणीयोजनांबाबत अभियंत्यांनी पाणी कंपातीचा प्रस्ताव दिला आहे. या गोदावरीवर सुमारे ७२ पाणीयोजना असून त्यांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. मुळा धरणातून नगर दक्षिण भागाती तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
शेवगाव व पाथर्डी ५४ गावे पाणीयोजनेचा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. पण काही दिवसांनी जायकवाडीचे पाणी कमी झाले तर तेथे उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यासाठी राक्षी येथे चर खोदून पाणी वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते काम तातडीने करण्यात येणार आहे.
मेअखेर पर्यंत कोठेही चाराटंचाई भासणार नाही असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. तरी त्यांना स्थानिक पातळीवर माहिती घेऊन चाराटंचाईची स्थिती काय, त्यामुळे दुध उत्पादनावर परिणाम झाला आहे का याची माहिती घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १३ मंडलमध्ये चाराटंचाईचा प्रश्न भासू शकतो. त्यात कर्जत, मिरजगाव, कुंभळी, पळशी, टाकळीढोकेश्वर, पाथर्डी, तळेगाव आदी मंडलचा समावेश आहे.
दरम्यान पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आल्याने येत्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची काळजी नाही. किमान या महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. मात्र पाऊस लांबला तरी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारी केले.
३१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
जिल्ह्यात २९३ गावे, १५७८ वाड्यांना ३१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातून ५ लाख ८२ हजार ३९० लोकांची तहान भागविण्यात येत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहे. त्या तालुक्यात ८३ गावे ४२९ वाड्यांना ९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सध्या संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा या ११ तालुक्यांमध्ये टँकर सुरू असून श्रीरामपूर, राहुरी व राहाता ही तीन तालुक्यात अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत.
जिल्ह्यात २० टक्के जलसाठा
जिल्ह्यात भंडारदरा, मुळा, निळवंडे या तीन मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा खूप कमी झाला आहे. या तीन प्रकल्पांमध्ये ४५ हजार ३५९ दलघफु पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ९ हजार ७१० दलघफु पाणीसाठा म्हणजे २१.४१ टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला या ती प्रकल्पांमध्ये २४ हजार ५३५ दलघफु पाणीसाठा होता. तो ५४.०९ टक्के होता आता तो निम्म्याने कमी झाला आहे. तर मध्यम सहा प्रकल्पांत ५ हजार ७३४ दलघफु पाणीसाठ्याची क्षमता असून सध्या या प्रकल्पांमध्ये १ हजार २३ दलघफु जलसाठा म्हणजे १७.८४ टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला २ हजार २५१ दलघफु पाणीसाठा होता.