Ahmednagar News : शेतीमधून काहीच परवडत नाही अशी एकीकडे ओरड असतानाच अहमदनगरमधील अनेक प्रयोगशील शेतकरी शेतीमधून वेगवेगळे प्रयोग करून शाश्वत उत्पन्न घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शेतीत विविध प्रयोग सुरु असतानाच आता संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अनोखी किमया केली आहे.
शेतात २० गुंठे क्षेत्रात १८० रोपांची लागवड करीत सफरचंदाची बाग फुलविली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे अविनाश कोंडीराम तांबे. त्यांनी संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावच्या शिवारातील शेतात ही सफरचंदाची बाग फुलविली आहे.
त्यामुळे काश्मीरचे सफरचंद आता चिंचपूरला पिकणार आहेत. सफरचंद बागेपासून त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असून शेतकऱ्यांसाठी सफरचंद शेतीचा हा प्रयोग लाभदायी ठरणार आहे. चिंचपूर शिवारातील शेतात २० गुंठे क्षेत्रात प्रयोगशील शेतकरी अविनाश तांबे यांनी १३ फूट बाय १० फूट लांब अंतरावर दोन बाय दोन फुटाचे व दीड फूट खोलीचे खड्डे घेतले.
त्यात सफरचंद एच. आर. ९९ या जातीची एकूण १८० रोपांची लागवड केली. सफरचंद रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था केली. सफरचंदासाठी जादा पाणी दिल्यास बुरशी लागते, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देण्याची आवश्यकता असते. औषध फवारणीसाठी बुरशीनाशक अँट्रकॉल, २२ स्टिन, एम ४५ तसेच अळी जाण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर केला.
उन्हाळ्यात सावलीसाठी झाडांच्या वर हिरवी नेट बांधली. तीन वर्षात रोपे मोठी झाली असून फळे येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक झाडाला साधारणपणे ४० ते ४५ फळे लगडली आहेत. सफरचंदाच पहिले फळ हे तीन वर्षानंतर सुरु होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी सफरचंद येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी साधारणपणे दहा किलो फळ एका झाडाला लागते.
दुसऱ्या वर्षापासून १५ ते २० किलो फळे येण्यास सुरुवात होते. सफरचंदाची फळे येण्यासाठी दोनशे तास थंड हवा मिळणे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये ४५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान चालते, असे शेतकरी अविनाश तांबे यांनी सांगितले.
सफरचंदाच्या बागेमधील जागेत घासाचे आंतरपीक घेण्यात येत आहे. सफरचंद झाडांना लागवडीनंतर तीन वर्षांनी पहिल्यांदाच फळे आली आहेत. सफरचंद शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी तांबे यांच्या शेतातील सफरचंद शेती बघण्यासाठी दूरवरून शेतकरी येवून माहिती घेत आहेत.