Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विसावलेला पाऊस आता पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २४ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत व नगर तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
जामखेड शहरासह खर्डा, मोहरी, नायगाव परिसरात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे नदी, नाले, तळे ओसंडून वाहू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार गणेश माळी यांनी दिले आहेत.
रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे सर्वदूर पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात ७७ मि.मी. पाऊस झाला. जामखेड मंडळात ९३.५, खर्डा ९२.३, नान्नज ६२ मि.मी व नायगाव मंडळात ९३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सात घरांची पडझड झाली असून, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. याशिवाय १० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याचा फटका १५० शेतकऱ्यांना बसला आहे.
पाथर्डी शहरासह परिसरात सोमवारी (दि. ८) रात्री सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ जोरदार पाऊस झाला. माणिकदौंडी, मोहरी, मोहटादेवी, तारकेश्वरगड, कुत्तरवाडीचा तलाव या डोंगर परिसरामध्ये पाऊस झाल्याने रात्रीतून शिरसाटवाडी येथील दोन तलाव भरले.
मोहरीचा तलाव चाळीस. तर कुत्तरवाडीचा तलाव ९० टक्के भरला. या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. खर्डे, दुले चांदगाव, साकेगाव, माळी बाभूळगाव, धामणगाव, मढी, शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, हंडाळवाडी, कारेगाव, मोहटा, करोडी, भिलवडे, अकोले, मोहोज देवढे त्याचप्रमाणे माणिकदौंडी परिसरात चांगला पाऊस झाला.
मोहरी तलाव ओव्हरफ्लो
मोहरी परिसरात जोरदार पावसामुळे नदी, ओढ्याकाठची शेती वाहून गेली. तर अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. मोहरी तलाव एकाच पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे.
खर्डा येथील कौतुका नदी व दरडवाडी येथील नदीला पूर आला होता. पैठण-पंढरपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
तालुकानिहाय झालेला पाऊस (मि.मी)
नगर २३.५, पारनेर १२.४, श्रीगोंदा ३१.८, कर्जत २९.५, जामखेड ७७, शेवगाव १२.८, पाथर्डी ५५.९, नेवासा २१.१, राहुरी १५.२, संगमनेर १५, अकोले १७.८, कोपरगाव १०.२, श्रीरामपूर १४.३, राहाता १३.