Ahmednagar News : वेबसिरीज चित्रीकरणासाठी अहमदनगरला पसंती, तिघांचे छायाचित्रीकरण सुरु, सव्वाशे स्थानिकांना रोजगार, लाखोंची उलाढाल

Pragati
Published:
वेबसिरीज चित्रीकरण

Ahmednagar News : वेब सिरीज हा अलीकडील काळात सर्वात झपाट्याने प्रसिद्ध होत चाललेला प्रकार आहे. मनोरंजन विश्वात आता वेब सिरीजने एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक मोठमोठे कलाकार वेब सिरीजमध्ये उतरले आहेत.

दरम्यान आता या वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी अहमदनगरला पसंती दिली जात आहे. कलाकार, तंत्रज्ञ व व्यावसायिकांची उपलब्धता, मोठ्या शहरांच्या तुलनेत निर्मितीसाठी येणारा कमी खर्च आदी कारणामुळे नगर शहर, भिंगार उपनगर आदी ठिकाणी जवळपास तीन वेब सीरिजचे छायाचित्रीकरण सुरु आहे.

यामुळे आता नगरमधील सव्वाशे स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, सहायक व व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे. मनोरंजन क्षेत्रात नावाजलेल्या निर्मितीसंस्था सध्या नगर शहर व नगर तालुक्यात वेबसिरीजचे छायाचित्रण करत आहेत. ग्रामीण बाजाचे विनोदी कथानक असलेल्या दोन वेबसिरीज नगर तालुक्यात तयार होत आहेत.

तर शिक्षण क्षेत्रातील विषयावर आधारित एक शालेय विद्यार्थ्यांवर बेतलेली वेबसिरीज भिंगारमध्ये तयार होत आहे. यापैकी नगर तालुक्यात चित्रीकरण सुरु असलेल्या दोन वेबसिरीजचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, सहायक कर्मचारी वृंद (५५ जण) स्थानिक आहेत.

तर भिंगारमध्ये चित्रीकरण सुरु असलेल्या वेबसिरीजसाठी पुण्यातील चमुसह स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, सहायक कर्मचारी (६८ जण) सहभागी आहेत. या सर्वांसाठी चहा, नाष्टा, जेवणासाठी स्थानिकांनाच रोजगार मिळाला आहे. दरम्यान आता यामधून पैशांची देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.

शहरात चित्रीकरण सुरु असलेली वेबसिरीजचे बजेट सुमारे २० लाख रुपये तर इतर काही गोष्टी पाहता एकंदरीत महिनाभरात अहमदनगरमध्ये ५० लाख रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. भविष्यात देखील येथे अनेक वेबसिरीज चित्रीकरण होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात एक मोठे आर्थिक प्लॅटफॉर्म येथे निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe