Ahmednagar News : गेल्या दोन तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवार (दि.20) रोजी नगर शहरात दुपारी दोनच्या सुमारास पावसाचे आगमन झाले.
त्यानंतर जिल्ह्यातील विविध भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. कर्जत शहर व परिसरात मंगळवारी (दि २०) सायंकाळी चार वाजता अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस एवढा जोरदार होता की जणू काही ढगफुटी झाली आणि अवघ्या अर्ध्या तासांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. कर्जत शहरातील मेन रोडवर नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कर्जत तालुक्यामध्ये या वर्षी सरासरीपेक्षा अवघ्या दोन महिन्यात ७० टक्के पाऊस झाला आहे. सोमवार (दि.19) रोजी राहुरी, पारनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे 98 मिमी. पावसाची नोंद झाली.
तर राहुरी तालुक्यातील राहुरी, टाकळीमिया, मंडलात 70 तर वांबोरीत 48 मिमी. पावसाची नोंद झाली. मोठ्या खंडानंतर सोमवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात 2 ते 3 तास मध्यम स्वरूपाचा दमदार पाऊस झाला.
या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजारी, कपाशी, तूर, मका यासह चारा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस होत होता. मात्र, मोठ्या पावसाची शेतकर्यांना प्रतिक्षा होती.
जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर असा मोठा पाऊस झालेला नाही. अपवाद वगळता झालेल्या दमदार आणि पेरणी लायक पावसावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. या पिकांना पावसाची मोठी प्रतिक्षा होती. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
पारनेर तालुक्यात सोमवार (दि.19) रोजी दुपारी 1 ते 3 दरम्यान झालेल्या मुसळधार वादळी वार्यासह पावसाने खरीप हंगामातील पिके भूईसपाट झाले असून शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, यात शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंडलनिहाय पावसाची आकडेवारी
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवरी दिलेल्या आकडेवारीत नगर तालुक्यातील नालेगाव 30.5, सावेडी 9, कापूरवाडी 20, नागापूर 41, जेऊर 31.8 चास 37, पारनेर तालुक्यातील भाळवणी 23, सुपा 36,
वाडेगव्हाण 37, श्रीगोंदा वडझिरे 98, पाथर्डी तालुक्यात पाथर्डी 56, माणिकदौंडी 48, करंजी राहुरी तालुक्यातील वांबोरीमध्ये 48, राहुरी 70, टाकळीमिया 70 मिलीमिटर पावसाचा समावेश आहे.