अहमदनगरच्या पाचवीतील अंतराने उणे १० अंश वातावरणात सर केले १८ हजार फुटांचे शिखर ! आफ्रिकेतल्या ज्वालामुखी पर्वतावर फडकावला तिरंगा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरची भूमी ही नेहमीच नवनवीन इतिहास घडवत असते. विविध क्षेत्रात अहमदनगरने मोठे योगदान दिलेले आहे. येथील अशी अनेक व्यक्तिमत्वेआहेत की देशाच्या इतिहासात त्यांचे मोठे योगदान आहे. आता पुन्हा एकदा अहमदनगरच्या लेकीने अहमनगरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

अवघ्या १० वर्षांच्या व पाचवीत शिकत असलेल्या अहमदनगरमधील अंतराने पर्वतावर १८ हजार फुटांपर्यंत चढाई केली. साध्यासुध्या पर्वतावर नव्हे तर आफ्रिका खंडातील टांझानिया येथील किलीमांजारो या पर्वतावर. डॉ. सोमेश्वर नरूटे व शर्मिला यांची ही कन्या आहे.

तिला एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन मिळाले होते. विशेष म्हणजे तिने तिच्यासोबत छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती नेली होती. त्यानिमित्ताने शिवराय, अहिल्यादेवींची मूर्ती प्रथमच आफ्रिकेतील ज्वालामुखी पर्वतावर पोहोचली.

अंतराने नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गड, रतनगड, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, कळसूबाई शिखर येथे यापूर्वी ट्रेकिंग केलेहोते. त्यामुळे तिचा बऱ्यापैकी सराव झाला होता. दरम्यान, सोलापूर येथील ३६० एक्सप्लोरर या साहसी मोहिमा आयोजित करणाऱ्या ग्रुपमार्फत आफ्रिका खंडातील टांझानिया येथील किलीमांजारो या सुप्त ज्वालामुखी पर्वतावर मोहीम आयोजित करण्यात आली होती.

यात अंतरा नरूटे ही प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्यासोबत सहभागी झाली. टांझानिया देशात असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४१ फूट) उंच आहे. या देशाच्या ईशान्य भागात पूर्व गोलार्धात ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे.

गिर्यारोहणाची आवड असलेले हौसी आणि धाडसी पर्वतप्रेमी किलीमांजारो पर्वताच्या शिखरावर मोहिमा आखत असतात. सततचे बदलणारे हवामान, उणे १० ते १५ अंशांपर्यंत तापमान, वादळी वारे, अतिशय कठीण व खडी चढाई हे या शिखराच्या मोहिमेमध्ये येणाऱ्या अडचणी होत्या. मात्र, त्यावर मात करून तिने हा विक्रम केला.

असा होता प्रवास…
किलीमांजारो पर्वतावरील चढाई किलीमांजारो नॅशनल पार्कपासून सुरू झाली. १० किलोमीटरचे घनदाट जंगलातून हे अंतर कापण्यास ६ तास लागले. त्यानंतर मंडारा हट ते होरंबो हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ९ तास,

तर होरंबो ते किबो हे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ८ तास लागले. उणे १० अंश तापमानात किबो हटपासून वर १८ हजार फूट उंच चढाई पूर्ण केल्यानंतर हवेतील बदलाचा व कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणामुळे चढाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ahmednagarlive24 Office