Ahmednagar News : अरेरे ! पाण्याच्या हौदात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू, नगरमधील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
news

Ahmednagar News : अहमदनगरमधील नेवासे येथील एकाच कुटुंबातील चौघे विहिरीत बुडून मरण पावल्याची नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाण्याने भरलेल्या हौदात पडून चार वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने घरातील कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी : घरासमोर खेळत असताना पाण्याने भरलेल्या हौदात पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भिंगार शहरातील घासगल्ली येथे बुधवारी (दि.१०) सकाळी घडली. केतन राहुल भिंगारदिवे (रा. घासगल्ली, भिंगार) असे या मयत बालकाचे नाव आहे.

केतन हा बुधवारी (दि. १०) सकाळी घरासमोर खेळत होता. हौदातून पाणी काढण्यासाठी तो गेला असता तोल जावून तो हौदात पडला. त्याची आई व घरातील इतर सदस्य कामात असल्याने त्याच्याकडे कोणाचे लवकर लक्ष गेले नाही. त्यामुळे काही वेळात पाण्यात बुडून तो बेशुद्ध झाला.

काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर त्याला तातडीने नगरमधील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी मेडिकल ऑफिसर यांनी दिलेल्या खबरेवरून भिंगार कम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत केतन याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहिण असा परिवार आहे.

नेवाशातील दुर्दैवी घटना
नेवासा तालुक्यातील वाकडी येथे मंगळवारी (दि. ९) पाच जण विहिरीत पडून मृत्यू पावल्याची घटना घडली होती. काळे कुटुंबाची सामूहिक ४५ ते ५० फुट खोल विहीर कोरडी होती.

त्या विहिरीत जनावरांच्या गोठ्यातील शेण-मूत्र, पाणी एकत्र सोडत होते. साधारण १० फुटांपर्यंत शेणाचा थर जमा झाला होता. या विहिरीत पडून काळे कुटुंबातील चौघे व इतर एक असे पाच जण मृत्युमुखी पडले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe