अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : निवडणुका संपताच चोरट्यांचा धुमाकूळ ! खून, घरफोडी, रोडरोमिओंचा कहर, पोलिस हतबल, नागरिक जेरीस

Published by
Ajay Patil

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरटयांनी हौदोस घातला आहे. दिवसाढवळ्या खून, घरफोडी आदी प्रकार घडत आहेत. रोडरोमिओंचा देखील त्रास महिलांना होऊ लागला आहे. भररस्त्यात लुटण्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत.

त्यामुळे लोकसभेची निवडणूक संपताच चोरट्यांनी डोके वर काढले असल्याचे चित्र असून पोलिस हतबल, नागरिक जेरीस असे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी करत कारवायांची मोहीम उघडली होती. शेकडो सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. परंतु, निवडणूक संपताच चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग मुलींच्या छेडछाडीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. मुलींचा पाठलाग करत हात ओढून चिठ्ठी देण्याचे रोडरोमिओंचे धाडस होते कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लांबविला. विशेष म्हणजे यातील एकही गुन्ह्याची अजून उकल झालेली नाही. विशेष म्हणजे मध्यंतरी भर दुपारी एका पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडले गेले, त्याचाही अजून उलगडा झालेला नाही. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.

त्यामुळे रोडरोमिओंचेही धाडस वाढले असून, रात्रीच्यावेळी महिला व मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ही बाब पोलिस गांभीर्याने घेणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात
आहे.

भररस्त्यात लूट
पुणे महामार्गावर भररस्त्यात जोडप्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी आहे. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने चोरून नेले. याबाबत कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परंतु, या गुन्ह्याचाही तपास लागलेला नाही. त्याआधीही घाटात प्रवासीलूटीचा प्रकार घडलेला होता.

चेन स्नॅचिंग
माऊली संकुलसमोर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण ओढताना जोराचा हिसका दिल्याने महिला जखमी झाली. तसेच जिल्ह्यातील अनेक भागात असल्या काही घटना घडलेल्या आहेत.

भरदिवसा घरफोड्या
शहर व परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. केडगाव परिसरात एका पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडण्यात आले. त्यानंतर धर्माधिकारी मळ्यातही चोरट्यांनी घर फोडले.

रोडरोमिओंचा त्रास
शहरातील एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना ताजी असतानाच रात्रीच्यावेळी पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करण्यात आला. एका मुलीचा जबरदस्तीने हात पकडून तिच्या हातात चिठ्ठी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय शाळा, कॉलेज, क्लासला जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढण्यासहहि अनेक प्रकार घडत आहेत.

Ajay Patil