Ahmednagar News : देशात काल सोमवारपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय सक्षम अधिनियम २०२३ यांनी अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतली.
दरम्यान हे कायदे कालपासून लागू झाले. दरम्यान या नवीन कायद्यानुसार अहमदनगरमधील रस्ता लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात झाला आहे. नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.
नव्या कायद्यानुसार रात्री बारा वाजेनंतर घडलेल्या गुन्ह्यांची नव्या फौजदारी कायद्यानुसार नोंद घेण्यात आली. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव शिवारात पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून एकाला लूटल्याची घटना घडली.
कोल्हापूर येथील गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी थांबविले. रस्त्यात थांबवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याच्या आंगठ्या सोन्याची चेन, रोख आठ हजार रुपये, मोबाईल, स्मार्ट वॉच, असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा ईनकॅमेरा पंचनामा करत भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) ३(५), आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची यथार्थ पोर्टलवर नोंद केली.
नवीन फौजदारी कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात रस्ता लुटीचा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी या गुन्ह्यासाठी ३९२, ३९४ प्रमाणे कलम लावण्यात येत होते.
नवीन कायद्यानुसार ३०९ कलम लावण्यात आले असून, हा गुन्हा यथार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आला असल्याची माहिती प्रशांत खैरे, अपर पोलिस अधीक्षक यांनी एका मीडियाला दिली.