एटीएम केंद्राच्या बाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र ऐनवेळी कटर मशीन बंद पडल्याने एटीएममधील दोन लाखांची रोकड वाचली आहे.
चोरट्यांचा हा सर्व उद्योग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नगर दौंड महामार्गावर खडकी (ता. नगर) गावात असलेल्या वक्रांगी कंपनीच्या एटीएम केंद्रावर शनिवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
याबाबत एटीएम केंद्र चालक प्रविण रावसाहेब काळे (रा. सारोळा कासार ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी काळे यांचे सारोळा कासार व खडकी अशा दोन ठिकाणी वक्रांगी कंपनीचे एटीएम आहेत.
शनिवारी (दि.९) सकाळी आठच्या सुमारास त्यांनी मोबाईल चालु करुन दोन्ही एटीएमचे कॅमरे पाहीले असता त्यांना खडकी येथील एटीएमला असणारे कॅमरे हे बंद दिसले. तेव्हा त्यांनी खडकी येथील सीसीटीव्ही ऑपरेटर कोठुळे यांना फोन केला व त्यांना सांगीतले की एटीएममधील कॅमेरे बंद आहेत.
तेथे तुम्ही जावुन पहा काय झाल आहे. तेव्हा श्रीकांत कोठुळे हे एटीएम केंद्रात गेले व त्यांनी काळे यांना फोन करुन सांगीतले की, एटीएमचा दरवाजा उघडा आहे व कॅमऱ्यावर स्प्रे मारलेला आहे.
ही माहिती मिळताच काळे हे लगेच खडकी येथे गेले. त्यांनी पाहीले असता एटीएमचा दरवाजा उघड्या अवस्थेत होता व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारलेला विसला. त्यानंतर त्यांनी रात्रभराचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सपोनि. शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलिस पथकासह तेथे आले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला. याबाबत प्रवीण काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चार चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न :- खडकी गावात जिल्हा बँकेच्या शाखेच्या इमारतीच्या गाळ्यात हे एटीएम आहे. शनिवारी (दि.९) पहाटे पावणे तीनच्या सुमारास एक कार तेथून काही अंतरावर येवून थांबली. कार मधून तोंडाला फडके गुंडाळलेले तीन जण खाली उतरले व एकजण कारमध्येच बसून राहिला.
ते तिघे एटीएम जवळ आले. त्यातील एकाने एटीएम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. नंतर सर्वजण आत गेले. आतील एका कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी उडालेल्या ठिणग्या सीसीटीव्हीत दिसून आल्या.
त्यानंतर काही वेळातच एटीएम मधील वीज पुरवठा खंडित झाला. बहुवा चोरट्यांनी एटीएम मधील इनव्हरर्टरच्या बॅटरीला कटर मशीन जोडले असावे. त्यामुळे त्यावर लोड येवून ते ट्रीप झाले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.
कटर मशीन बंद पडल्याने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला व ते तेथून निघून गेले. त्यावेळी एटीएममध्ये दोन लाखांची रोकड होती असे फिर्यादी प्रवीण काळे यांनी सांगितले.