Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांत कार्यालयात तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कर्जत प्रांत कार्यालयात घडली आहे.
आशिष बोरा असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळीच धाव पुढील अनर्थ टळला.
अधिक माहिती अशी : कर्जत नगरपंचायत निवडणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्याचे शासकीय बिल अद्याप मिळाले नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा करून त्याची दखल न घेतल्याने आशिष बोरा यांनी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात काही काळ ठिय्या देत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आशिष बोरा यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूक व्हिडीओ चित्रीकरणाचे २०१५ आणि २०२१-२२ चे टेंडर घेतले होते असे त्यांचे म्हणणे आहे. हे काम पूर्ण करूनही आजमितीस एकदाच ६० हजार रुपयांचे बिल अदा करण्यात आले.
उर्वरित पैशांसाठी त्यांनी वारंवार नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शिरस्तेदार मच्छिंद्र पाडळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यास यश येत नसल्याचे बोरा यांना निदर्शनास आले. त्यांनी बॅगेत सोबत आणलेली पेट्रोलची बाटली उघडत दालनातच अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसह महसूल अधिकारी- कर्मचारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
सन २०१५ आणि २०२१-२२ निवडणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण आणि त्याचा डेटा संबंधितांनी कर्जत नगरपंचायतीकडे जमा केला आहे. त्याची तपासणी करून जे रीतसर देयक असतील ते अदा करण्यात येईल.
सोमवारी (दि.८) सर्व व्हिडीओ चित्रीकरण करणारे यांची बैठक बोलावली होती. त्यात मार्ग काढण्यात आला होता अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.