Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कलाकेंद्र व त्यावरील प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जामखेड येथील एका कला केंद्रावर व्यावसायिकाला प्रचंड मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
जामखेड येथील एका कला केंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड फेकून मारत, लोखंडी रॉडने मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत दोघांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जामखेड पोलिसात उजेफ रफीक शेख (रा. सदाफुले वस्ती, जामखेड) यांनी फिर्याद दिली.
बुधवारी (दि. २६) रात्री अकरा वाजता जामखेडमधील एका कला केंद्रावर उजेफ शेख गेले होते. तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर व सोनू वाघमारे यांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करून शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सोनू वाघमारे याने शेख यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या दिशेने दगड फेकून मारला. विक्रम डाडर याने लोखंडी रॉडने मानेवर वार केला. दोघांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेख यांना खड्ड्यात फेकून गंभीर दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटल आहे. शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कला केंद्रावरील गैरप्रकार पुन्हा समोर
मारहाणीच्या घटनेमुळे जामखेडमधील कला केंद्र पुन्हा चर्चेत आले आहेत. जामखेड व मोह हद्दीत असलेल्या कला केंद्रात सातत्याने मारहाणीच्या घटना घडतात. कला केंद्र रात्रभर चालू राहतात. जामखेड तालुका चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने राज्यभरातील गुंड प्रवृत्तीचे लोक येथील कला केंद्रावर येतात. त्यामुळे अनेकदा मारहाणीच्या घटना घडतात असे नागरिक सांगतात.