Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणास अपघात झाल्याचा बनाव करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. ११) घडली. अजिंक्य अरुण डहाळे असे या तरुणाचे नाव असून तो पारनेर तालुक्यातील पळशी येथील आहे.
यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला, हाताला, डोक्याला मार लागलाय. नगरच्या खासगी रुग्णालयात डोक्याला शस्त्रक्रिया करून उपचार सुरू आहेत. परंतु, या जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी हा अपघात नव्हे तर पूर्व नियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे पारनेर पोलिसांनी याप्रकरणी वापरण्यात आलेली पिकअप व दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. नूतन अरुण डहाळे (वय ३७, रा. पळशी, ता. पारनेर) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
या फिर्यादीनुसार संदीप सुखदेव मोढवे, त्याचे वडील सुखदेव मोढवे (पूर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. पळशी, ता. पारनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव सावताळ गावात सावताळ बाबा कमानीच्या मंगळवारी (दि. ११) रात्री ७.४५ वाजता ही घटना घडली. गुरुवारी (दि. १३) अपघाताचा बनाव रचून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघा बाप-लेकांवर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींनी मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अजिंक्य डहाळे याच्या मोबाइलवर फोन करून शिवीगाळ केली. त्याला बोलावून घेऊन मारहाण करत अज्ञात वाहनाने धडकाविण्याचा बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पळशी येथील या तरुणाच्या घटनेसंदर्भात आईच्या फिर्यादीवरून या घटनेत वापरण्यात आलेली पिकअप व दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. डहाळे कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
परंतु, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हा अपघात की अपघाताचा बनाव हे चौकशीनंतर लवकरच बाहेर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.