Ahmednagar News :प्रहार दिव्यांग संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू हे चर्चेतील राजकीय व्यक्तिमत्व. ते नेहमीच अनेक प्रश्न मांडून अनेक समस्यांना वाचा फोडत असतात. आता त्यांनी अहमदनगर मनपातील एका प्रकरणाला हात घातला आहे.
बांधकाम प्रीमियमची रक्कम न भरता खोटे प्रमाणपत्र सादर करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवत महापालिकेची फसवणूक केल्याचे प्रकरण आता आ. कडू यांनी विधीमंडळात नेल्याने मनपा प्रशासन अडचणीत आले आहे.
त्यामुळे आता प्रशासनाला वाचवण्यासाठी कोणी नगरी राजकारणी पुढे येणार काय, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. नगरमधील बांधकाम व्यावसायिकाने बनावट पावत्या व खोटे प्रमाणपत्र करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी तारांकित प्रश्न केला आहे.
त्यामुळे विधीमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात या विषयाचे उत्तर आ. कडूंना द्यावे लागणार असल्याने शासनाने महापालिकेला पत्र पाठवून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर केलेल्या कारवाईची माहिती मागवली आहे. अशी माहिती मागवल्याचे मनपा विश्वात समजल्यावर खळबळ उडाली आहे.
मनपा प्रशासन यावर काय उत्तर देते व विधी मंडळात जेव्हा शासन यावर बाजू मांडेल, त्यावेळी आ. कडू यांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
नगरमधील एका कंपनीच्या संचालकांनी जवळपास पावणेपाच कोटी रुपये इतक्या रकमेच्या बनावट पावत्या व खोटे प्रमाणपत्र तयार करून अहमदनगर महापालिकेकडे भरणा केल्याचे दाखवून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविला असल्याचे महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक यांनी त्यांच्या पत्रात मान्य केले आहे.
तसेच, या प्रकरणी कंपनीच्या संचालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत गालिब अली व इतर अनेक नागरिकांनी तक्रार अर्ज सादर करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, या कंपनीचे संचालक व मालक तसेच संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली, नसल्यास कारवाईस विलंब का केला जात आहे, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला आहे.
.