Ahmednagar News : अहमदनगर शहर व रस्त्यांची दुरवस्था हे जणू समीकरणच. ही व्यथा मीडियानेही वारंवार मंडळी तर नागरिकांनी यासाठी आजवर आंदोलनेही केली. पण याचा परिणाम ना लोकप्रतिनिधींवर झाला ना यंत्रणेवर.
त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे तशीच असल्याचे दिसते. आता नगर शहरातील एक महत्वपूर्ण रस्ता टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महाल रस्ता. नगरोत्थान योजनेतील व्याजाचे सुमारे ३.८४ कोटी रुपये खर्चुन केलेला हा मॉडेल रस्ता अवघ्या वर्षभरातच खराब झाला आहे.
विशेष म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांनी या कामाचे बिल ठेकेदाराला अदा करून फाईल बंद देखील केलीये. रस्त्यावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला असून नगरकरांना आजही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याची बोंब नागरिक मारत आहेत.
ही सगळी दुरवस्था समोर दिसत असूनही ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता, रस्त्याची दुरुस्ती न करता महापालिका आयुक्त फक्त कारवाईचा इशारा देण्यातच धन्यता मानत असून लोकप्रतिनिधी, नगरसेवकही यावर सोयीस्कर मौन बाळगून असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच भिस्तबाग चौक ते महालापर्यंतचा रस्ता खराब होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर प्रोफेसर चौकात व टीव्ही सेंटर येथे रस्ता खराब झाला. अशाच परिस्थितीत या कामाचे बिलही महापालिकेने अदा केले.
रस्त्याबाबत तक्रारी सुरू झाल्यावर मनपाने ठेकेदाराला दुरुस्तीसाठी नोटीसही बजावली. मात्र, त्याला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली. आयुक्त पंकज जावळे यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचा ५० लाखांचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करण्याचे, त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मात्र, अद्यापही कारवाई झालेली नाही. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च वसूल करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.
तपासणीची मागणी करत आर्थिक हातभारही लावला पण परिणाम शून्य..
या रस्त्याचे काम झाल्यानंतर काही दिवसातच एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकामार्फत तपासणी करा अशी मागणी केली. मनपाला आर्थिक भार नको, म्हणून त्यांनी आयुक्तांच्या नावाने २५ हजारांचा डीडी दिला होता. परंतु मनपाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती मिळाली आहे.
ठेकेदारावर कारवाई होणार ?
टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महालापर्यंत हा जो रस्ता आहे तो अनेक ठिकाणी खराब झालाय. जर दोन वर्षात रस्ता खराब झाला तर तो दुरुस्त करण्याची अट आहे. त्यानुसार मागील वर्षीच नोटीस बजावली होती.
मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. आठवडाभरात ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती एका अभियंत्याने मडियाला दिली आहे.