Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात साधारण महिनाभरापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले होते. आता काल (दि.९ मे ) व आज दि. (१० मे) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. १४ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
काल (दि.९ मे ) रोजी वातावरणात अचानक बदल होऊन संगमनेर तालुक्याच्या काही गावांमध्ये गुरुवारी (दि.०९) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. शहर आणि परिसरातील तसेच तालुक्याच्या पठार भागातील काही गावांमध्ये पावसाचा शिडकावा झाला.
तालुक्यातील समनापूर, वडगाव पान, कोकणगाव, मांची, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, करूले, निळवंडे, तळेगाव दिघे, तिगाव, कौठे कमळेश्वर, कासारा दुमाला, घुलेवाडी, संगमनेर खुर्द, सुकेवाडी, गुंजाळवाडी आदी गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
वादळी पावसाने नुकसान ..
वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला होता. आश्वी खुर्द येथे आठवडे बाजार होता तेथेही धावपळ उडाली. तालुक्यातील वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये गुरुवारी कांदा लिलाव होता.
या बाजार समितीमध्ये काही प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ झाली. सायंकाळी पावसाचे वातावरण गडद झाले होते. संध्याकाळी पाच-साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली.
जोरदार वादळ देखील सुरू झाले. काढणी झालेला कांदा शेतातच पोळी लावून ठेवला होता. वादळी वाऱ्याने कांदा झाकलेले प्लास्टिक कागद उडून गेल्याने कांदा भिजून नुकसान झाले.
झाडाखाली गायी दबल्या
तालुक्यातील करुले येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळील लिंबाचे झाड वादळाने उन्मळून पडले. या झाडाखाली तीन गायी दाबल्या गेल्या, त्यातील एक गाय ठार झाली. तसेच इतरही ठिकाणी झाडे पडली. काहींच्या घराचे पत्रे उडाले, पोल्ट्री व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
आजही (दि. १० मे ) पावसाला सुरवात
आजही दुपारनंतर पावसाला सुरवात झाली होती. नगर शहरासह ग्रामीण भागातही दुपारी पावसाने हजेरी लावली.