Ahmednagar News : जामखेड तालुक्याला अवकाळीचा तडाखा : वादळाने अनेक घरांवरील पत्रे उडाले

Ahmednagarlive24 office
Updated:

 

Ahmednagar News :  जिल्ह्यासह राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जामखेड तालुक्यातील खर्डा, तेलंगशी व खडर्याजवळील मुंगेवाडी, दरडवाडी, या गावांना रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंगावर झाड पडल्याने एकजण जखमी झाला आहे .

यावर्षी उन्हाळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत होत्या पारा चांगलाच वाढला होता. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता वाढतच होती तसेच उन्हाच्या काहीलीने जामखेड शहर व परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शहराला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. अचानक झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील तेलंगशी येथील भिकाजी मोरे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले तसेच अंगावर झाड पडल्याने भिकाजी मोरे हे जखमी झाले आहेत.

मोरे यांच्यावर जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. वादळी पावसाने खर्डा, तेलंगशी व खडर्याजवळील मुंगेवाडी, दरडवाडी, या गावांतील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तसेच अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. खडर्याजवळील मुंगेवाडी येथील शिंदे या शेतकऱ्याच्य घराचे व जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंगेवाडी व इतर गावातील अनेक घरांची पडझड झाली असून कडब्याच्या गंजी ही उध्वस्त झाल्या तर अनेक जनावरांचे गोठे ही उडून गेले आहेत. त्याचसोबत खर्डा गावातील व कानिफनाथ मंदिरा जवळ असलेल्या मदारी वस्ती येथील अनेक घरावरील पत्रे उडाले असून काही घरे पडली आहेत.

तहसीलदारांनी या घटनेची पाहणी करत तत्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांसह नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.